Wednesday, March 31, 2010

बटाट्याच्या विविध प्रकारच्या भाज्या


कमी वेळ असतांना बटाट्याची भाजी पटकन होते. बटाट्यासोबत गाजर, मटार, पानकोबी, फुलकोबी, भेंडी, नारळाच दुध, दही, कोरड खोबर, ओल खोबर काय वाट्टेल ते चांगल लागत. बटाटा परतून, रस्सा अस त्यात अजुन एक परम्युटेशन कॉंबिनेशन.

बटाट्याच्या भाजीचे काही निरनिराळे प्रकार:

बटाटा भाजी परतून
१. १/२ किलो बटाटे
२. चवीनुसार लाल तिखट
३. २ डाव तेल
४. मोहरी, हिंग, हळद
५. मीठ
६. सुके खोबरे, कोथिंबीर

१. बटाटे स्वच्छ धुवून साल काढून (साल आवडत असल्यास साल ठेवून) एका बटाट्याचे ४ उभे काप करून नंतर पातळ उभ्या काचरया करुन पाण्यात टाकाव्यात.

२. पसरट कढईमधे तेल घालून फोडणी करावी

३. चिरलेले बटाटे घालून प्रथम परतून लाल तिखट घालावे, परतून त्यावर झाकण ठेवावे.

४. बटाट्याला एक वाफ आल्यावर अंदाजाने मीठ घालून परतावे. झाकण न ठेवता मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत परतावे. फोडी चुरचुरीत झाल्या पाहिजेत. बटाटे शिजुन चांगले परतले गेले की भाजीला तेल सुटते.

५. थोडे सुके खोबरे व कोथिंबीर घालून भाजी उतरवावी.

ह्या भाजीसोबत आवडत असल्यास खालीलप्रमाणे व्हेरियेशन्स करता येतात:
१. थोडी साखर
२. लसुण, लाल सुक्या मिर्च्या
३. कांदा

***२ ब्रेड्सना लोणी लावुन मधे ह्या भाजीचे सारण घालून सॅंडविच मेकर मधुन काढावी... दुपारच्या स्नॅक करता छान लागते.

बटाटा रस्सा

१. १/२ किलो मध्यम आकाराचे बटाटे
२. २ कांदे, २ टोमॅटो
३. १/२ वाटी सुके खोबरे
४. २ लसुण पाकळ्या (अमेरिकेमधे लसुणीचा साइझ जंबो असतो, तुमच्या आवडीप्रमाणे लसुण अ‍ॅड करावी)
५. १ इंच आल
६. १/२ ते १ चमचा गरम मसाला (आवडीप्रमाणे)
७. हळद, १-२ डाव तेल (मला कमी तेलात भाज्या आवडतात)
८. १/२ नारळाची वाटी खवून
९. मुठभर कोथिंबीर
१०. मीठ साखर चवीनुसार

१. बटाटे धुवून सोलून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करुन पाण्यात टाकाव्यात.

२. कांदे बारिक चिरून घ्यावेत. कढईत तेल घालून खमंग परतून घ्यावेत. त्यातच सुके खोबरे गुलाबी रंगावर परतावे.

३. त्यात गरम मसाला, लाल तिखट, आले, लसुण घालून सर्व मिश्रण बारीक वाटुन घ्यावे (मी मिक्सरचा वापर करते)

४. पातेल्यात तेल तापवून फोडणी घालावी त्यावर बटाटे घालून त्यावर थाळी ठेवून वाफावून घेणे.

७. बटाटा निम्मा शिजला की त्यात वाटलेला मसाला घालून बारीक चिरलेला टोमॅटो घालणे, ४ वाट्या उकळ्ते पाणी घालून मीठ साखर घालणे. रस्सा उकळला की त्यात खवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर घालावे.

*** वरील भाजी मधे अजुन एक व्हेरियेशन म्हणजे त्यात २ वाट्या चिरलेला फ्लॉवर व १ वाटी मटार घालणे.

बटाट्याचा झटपट रस्सा

१. ३-४ उकडलेले बटाटे
२. २ टे. स्पुन साजुक तुप
३. १ टे. स्पुन जिर, १/२ चमच हळद, १/२ चमचा लाल तिखट
४. २-३ हिरव्या मिर्च्या
५. कोथिंबीर, मीठ
६. १/२ वाटी दही (फार आंबट नको)

क़ृती:

१. उकडलेले बटाटे सोलुन बारीक चिरुन घ्यावे.

२. तुपाची जिर व हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्या, आवडत असल्यास लाल तिखट व १/२ वाटी दही घालावे.

३. त्यात बटाटे, मीठ व ३ वाट्या पाणी घालून रस्सा चांगला उकळू द्यावा. दाटसर झाला की कोथिंबीर घालून उतरवावा.

व्हेरियेशन: आवडत असल्यास फोडणीमधे १ बारिक चिरलेला टोमॅटो घालावा.

कांदा बटाटा भाजी:

१. पाव किलो बटाटे
२. पाव किलो पांढरे कांदे
३. २ डाव तेल
४. १ चमचा लाल तिखट
५. मीठ, १ चमचा पिठीसाखर
६. कोथिंबीर

क़ृती:

१. बटाटे, कांदे सोलून त्यांच्या मोठया फोडी करणे

२. पातेल्यात तेलाची फोडणी करुन त्यात कांदे व बटाटे एकदम घालावे. पातेल्यावर थाळीत पाणी घालून मंद गॅसवर वाफेला ठेवावी.

३. चांगले शिजत आल्यावर लाल तिखट, मीठ व पिठीसाखर घालून पूर्ण शिजू द्यावी. सर्व्ह करतांना कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

0 comments:

Post a Comment