Wednesday, March 31, 2010

अंडाकरी

१. ६ अंडी
२. पाव किलो कांदे
३. अर्धा पाव टोमॅटो
४. २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल वाटून
५. १ वाटी ओला नारळ वाटून
६. १ चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिर
७. १ चमचा धने जिरे पावडर, १ चमचा गरम मसाला
८. ३ चमचे तेल
९. मीठ
१०. मुठभर चिरलेली कोथिंबीर

क़्रूती:

१. पातेल्यात पाणी कोमट करून अंडी घालून उकडून घ्यावीत.

२. कांदे किसून घ्यावेत. बटाटे बारीक चिरून घ्यावे.

३. पातेलीत तेल गरम करून पाव चमचा जिर घालून त्यावर किसलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतून तेल बाजूला सुटले की त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने, जिरे पावडर घालून परतावे. किसलेले टोमॅटो घालून परतावे. त्यात ३ वाट्या उकळते पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे. वाटलेला ओला नारळ घालून करी चांगली उकळू द्यावी.

४. उकडलेली अंडी सोलून त्याचे प्रत्येकी २ उभे भाग करून उकळलेल्या करीमधे टाकावेत. कोथिंबीर घालून करी उतरवावी.

पनीर भुर्जी

१. अर्धा किलो पनीर
२. पाव किलो पानकोबी
३. १०० ग्रॅम भोपळी मिरच्या
४. २ मोठे कांदे चिरुन
५. २ टोमॅटो बारीक चिरुन
६. १०-१२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
७. मुठभर चिरलेली कोथिंबीर
८. २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल वाटून
९. १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, मीठ
१०. २ चमचे तुप

क़्रूती:
१. पानकोबी बारीक चिरून घ्यावी.

२. भोपळी मिरच्या बिया काढून बारीक पातळ चिरून घ्याव्यात.

३. पनीर जाड किसणीवर किसून घ्यावे.

४. ३ चमचे तेल कढईत गरम करावे. त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. मिरच्याचे तुकडे घालून परतावे. चिरलेला कांदा परतून घ्यावा. मिरच्याचे तुकडे घालून परतावे. वाटलेले आले, लसूण, लाल तिखट, गरम मसाला घालून परतावे. चिरलेला टोमॅटो घालून परतावे. बारीक चिरलेलू पानकोबी व भोपळी मिरच्या अर्धवट शिजेपर्यंत परतावे. किसलेले पनीर घालावे. चवीनुसार मीठ घालून परतावे. पाणी अजिबात घालू नये.

२ ब्रेडच्या मधे सारण म्हणून वापरून ती सॅंडविचेस छान लागतात.

बटाट्याच्या विविध प्रकारच्या भाज्या


कमी वेळ असतांना बटाट्याची भाजी पटकन होते. बटाट्यासोबत गाजर, मटार, पानकोबी, फुलकोबी, भेंडी, नारळाच दुध, दही, कोरड खोबर, ओल खोबर काय वाट्टेल ते चांगल लागत. बटाटा परतून, रस्सा अस त्यात अजुन एक परम्युटेशन कॉंबिनेशन.

बटाट्याच्या भाजीचे काही निरनिराळे प्रकार:

बटाटा भाजी परतून
१. १/२ किलो बटाटे
२. चवीनुसार लाल तिखट
३. २ डाव तेल
४. मोहरी, हिंग, हळद
५. मीठ
६. सुके खोबरे, कोथिंबीर

१. बटाटे स्वच्छ धुवून साल काढून (साल आवडत असल्यास साल ठेवून) एका बटाट्याचे ४ उभे काप करून नंतर पातळ उभ्या काचरया करुन पाण्यात टाकाव्यात.

२. पसरट कढईमधे तेल घालून फोडणी करावी

३. चिरलेले बटाटे घालून प्रथम परतून लाल तिखट घालावे, परतून त्यावर झाकण ठेवावे.

४. बटाट्याला एक वाफ आल्यावर अंदाजाने मीठ घालून परतावे. झाकण न ठेवता मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत परतावे. फोडी चुरचुरीत झाल्या पाहिजेत. बटाटे शिजुन चांगले परतले गेले की भाजीला तेल सुटते.

५. थोडे सुके खोबरे व कोथिंबीर घालून भाजी उतरवावी.

ह्या भाजीसोबत आवडत असल्यास खालीलप्रमाणे व्हेरियेशन्स करता येतात:
१. थोडी साखर
२. लसुण, लाल सुक्या मिर्च्या
३. कांदा

***२ ब्रेड्सना लोणी लावुन मधे ह्या भाजीचे सारण घालून सॅंडविच मेकर मधुन काढावी... दुपारच्या स्नॅक करता छान लागते.

बटाटा रस्सा

१. १/२ किलो मध्यम आकाराचे बटाटे
२. २ कांदे, २ टोमॅटो
३. १/२ वाटी सुके खोबरे
४. २ लसुण पाकळ्या (अमेरिकेमधे लसुणीचा साइझ जंबो असतो, तुमच्या आवडीप्रमाणे लसुण अ‍ॅड करावी)
५. १ इंच आल
६. १/२ ते १ चमचा गरम मसाला (आवडीप्रमाणे)
७. हळद, १-२ डाव तेल (मला कमी तेलात भाज्या आवडतात)
८. १/२ नारळाची वाटी खवून
९. मुठभर कोथिंबीर
१०. मीठ साखर चवीनुसार

१. बटाटे धुवून सोलून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करुन पाण्यात टाकाव्यात.

२. कांदे बारिक चिरून घ्यावेत. कढईत तेल घालून खमंग परतून घ्यावेत. त्यातच सुके खोबरे गुलाबी रंगावर परतावे.

३. त्यात गरम मसाला, लाल तिखट, आले, लसुण घालून सर्व मिश्रण बारीक वाटुन घ्यावे (मी मिक्सरचा वापर करते)

४. पातेल्यात तेल तापवून फोडणी घालावी त्यावर बटाटे घालून त्यावर थाळी ठेवून वाफावून घेणे.

७. बटाटा निम्मा शिजला की त्यात वाटलेला मसाला घालून बारीक चिरलेला टोमॅटो घालणे, ४ वाट्या उकळ्ते पाणी घालून मीठ साखर घालणे. रस्सा उकळला की त्यात खवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर घालावे.

*** वरील भाजी मधे अजुन एक व्हेरियेशन म्हणजे त्यात २ वाट्या चिरलेला फ्लॉवर व १ वाटी मटार घालणे.

बटाट्याचा झटपट रस्सा

१. ३-४ उकडलेले बटाटे
२. २ टे. स्पुन साजुक तुप
३. १ टे. स्पुन जिर, १/२ चमच हळद, १/२ चमचा लाल तिखट
४. २-३ हिरव्या मिर्च्या
५. कोथिंबीर, मीठ
६. १/२ वाटी दही (फार आंबट नको)

क़ृती:

१. उकडलेले बटाटे सोलुन बारीक चिरुन घ्यावे.

२. तुपाची जिर व हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्या, आवडत असल्यास लाल तिखट व १/२ वाटी दही घालावे.

३. त्यात बटाटे, मीठ व ३ वाट्या पाणी घालून रस्सा चांगला उकळू द्यावा. दाटसर झाला की कोथिंबीर घालून उतरवावा.

व्हेरियेशन: आवडत असल्यास फोडणीमधे १ बारिक चिरलेला टोमॅटो घालावा.

कांदा बटाटा भाजी:

१. पाव किलो बटाटे
२. पाव किलो पांढरे कांदे
३. २ डाव तेल
४. १ चमचा लाल तिखट
५. मीठ, १ चमचा पिठीसाखर
६. कोथिंबीर

क़ृती:

१. बटाटे, कांदे सोलून त्यांच्या मोठया फोडी करणे

२. पातेल्यात तेलाची फोडणी करुन त्यात कांदे व बटाटे एकदम घालावे. पातेल्यावर थाळीत पाणी घालून मंद गॅसवर वाफेला ठेवावी.

३. चांगले शिजत आल्यावर लाल तिखट, मीठ व पिठीसाखर घालून पूर्ण शिजू द्यावी. सर्व्ह करतांना कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

शाही कोफ्ता पुलाव


१. दोन वाट्या बासमती तांदुळ
२. २ वाट्या मटार सोललेले
३. १ वाटी श्रावणघेवडा (मी होल ग्रीन बीन्स वापरलेले)
४. १ वाटी गाजराचे तुकडे

कोफ्त्याकरता साहित्य:
१. पाव किलो खवा
२. १ उकडलेला बटाटा
३. १ टे. स्पुन कॉर्नफ्लॉवर
४. २ हिरव्या मिर्च्या
५. १/२ इंच आल
६. २-३ लसुण पाकळ्या वाटुन
७. मीठ, मिरपुड चवीनुसार
८. तुप
९. पाव चमचा शहाजिरे, ३-४ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, ४-५ काळेमिरे
१०. २ मोठे कांदे उभे चिरुन
११. मुठभर काजु
१२. २५ ग्रॅम बेदाणे

क्रूती:

१. पाव किलो खवा, १ उकडलेला बटाटा श्रीखंडाच्या यंत्रातुन गाळुन त्यात १ चमचा कॉर्नफ्लॉवर, आल, मिरची, मीठ, मिरपुड लसुण घालावे. हलक्या हाताने ४०-४२ गोळे करुन तुपात तळावेत.

२. निम्मा चिरलेला कांदा व काजु तळुन बाजुला ठेवावे.

३. जाड बुडाच्या पातेल्ल्यात तुप गरम करुन जिरे, वेलदोडे, लवंगा, दालचिनी घालुन फोडणी करावी, त्यात चिरलेला निम्मा कांदा घालुन परतावे. त्यावर भाज्या घालून परतावे. धुवुन निथळुन ठेवलेले तांदुळ घालुन परतावे, त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालुन उकळते पाणी घालुन चवीनुसार मीठ घालावे. मंद आचेवर पुलाव शिजु द्यावा.

४. वाढताना वरुन तळ्लेले कोफ्ते, काजू व कांदा घालून सजवून वाढावे.

Monday, March 29, 2010

पालक पनीर

१. २ गड्ड्या पालक
२. २-३ हिरव्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल
३. १ मोठा कांदा बारीक चिरुन
४. १ डाव रिफाईंड तेल, जिरे फोडणीकरता
५. १ मोठा टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून साल काढून बारीक चिरावा
६. पाव किलो पनीर, पनीर तळण्याकरता तेल
७. मीठ
८. १ चमचाभर गरम मसाला पावडर

क़ृती:

१. पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरावा. १ चिमुटभर सोडा घालून उकडून घ्यावा व चाळणीत निथळत ठेवावा. पाणी बाजुला ठेवावे.

२. पनीरचे अर्धा इंच लांबी रुंदीचे चौकोनी तुकडे करुन गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.

३. उकळून निथळलेला पालक पाट्यावर अथवा मिक्सरवर बारीक वाटावा.

४. कढईत तूप किंवा रिफाईंड तेलाची जिरे घालून फोडणी करावी व फोडणीत बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.

५. कांद्यात मिरची आल लसूण बारीक वाटून घालावे. उकडून चिरलेला टोमॅटो व गरम मसाला घालून परतावे. तूप बाजूला सुटले की वाटलेला पालक व तळलेले पनीर घालावे. पळीवाढ करण्याकरता उकडलेल्या पालकातल्या पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करावा. चवीनुसार मीठ घालावे.

६. पालक व पनीर शिजेपर्यंत शिजवावे व उतरवावे.

Wednesday, March 24, 2010

भेंडीची चिंच गुळाची भाजी

१. पाव किलो भेंडी
२. थोडी चिंच भिजवून कोळ काढून (मी रेडिमेड चिंचेचा पल्प वापरते)
३. मीठ व गूळ चवीनुसार
४. १ डाव तेल व फोडणीचे साहित्य

क़ूती:

१. भेंडी धुवून कोरडी मोठी चिरावी.
२. पातेल्यात तेल, हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करुन त्यात चिरलेली भेंडी घालून परतावे.
३. परतलेल्या भेंडीवर चिंचेचा कोळ घालावा. १ वाटी पाणी घालून झाकण ठेवून शिजवावे.
४. भेंडी शिजल्यावर चवीनुसार मीठ व गूळ घालावा. भाजीला दाटसर रस ठेवून चिरलेली कोथिंबीर घालून भाजी उतरवावी.

व्हेरीयेशन:

चिंचे ऐवजी अर्धी वाटी आंबट ताक व हिरवी मिरची व १ टे. स्पुन दाण्याचे कुट घालून भाजी उतरवावी.

Saturday, March 13, 2010

व्हेजिटेबल बिर्याणी


४ भांडी बासमती राइस
६ टे. स्पुन तुप
१ चमचा जिरे
५ तमालपत्र पान
३ हिरवे वेलदोडे
५ लवंगा
५ दालचिनीचे तुकडे

१/२ किलो फ्लॉवर
१/२ किलो बटाटे उकडुन
१/२ किलो लाल गाजर - पातळ उभे तुकडे
१ भोपळी मिर्ची
१ बीट
१ इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या वाटुन
१/२ किलो कांदे उभे पातळ चिरुन
पाव किलो टोमॅटो पातळ चिरुन
५० ग्रॅम काजु,२५ ग्रॅम बेदाणे

बिर्याणी मसाला - २ टे. धने, १ टे. सुके खोबरे, १ टे. खसखस, १ टे. बडीशेप, १ टे. स्पुन काजु तुकडा, ५ लवंगा, ३ दालचिनीचे तुकडे, ५ काळे मिरे, ५ सुक्या मिर्च्या, १ चमचा जिरे, मिठ - हे जिन्नस १ चमचा तेलावर भाजुन कुटुन घ्यावे. हा मसाला रेडिमेड पण मिळतो.
३० मिनिट तांदुळ कोमट पाण्यात घालुन ठेवावे
पातळ चिरलेला कांदा परतुन, काजु व बेदाणा परतुन बाजुला ठेवावे.

उकडलेल्या बटाट्याच्या गोल चकत्या कराव्यात

परतलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा बारीक वाटुन घ्यावा.
सर्वे भाज्या उकळत्या पाण्यात वाफवुन घ्याव्या
तांदुळ एका भांड्यात शिजवुन घ्यावा. (मी कुकरमधे शिजवुन घेते)

एका मोठ्या कढईमधे २ टे. तुपाची फोडणी करुन त्यात जिरे, तमालपत्र, वेलदोडे, लवंगा, दालचिनी घालुन त्यात कांदा, आल, लसुण घालुन सर्व भाज्या परतुन घ्यावा. त्यात भात व बिर्याणी मसाला घालुन नीट मिक्स करुन घ्यावे, सर्व्ह करतांना थोडा तळलेला कांदा व काजु, बेदाणे घालावे.

(सर्वे मिक्स करायच्या ऐवजी लेयर्स मधे सुध्दा बिर्याणी करता येते, लेयरस मधे - उकडलेले बटाटे- परतलेल्या भाज्या - भात - भाज्या)

खिचडी


२ वाट्या तांदुळ
१ वाटी तुरीची डाळ
३-४ लसुण पाकळ्या
१ वाटी तेल
मीठ
५ तळणीच्या मिर्च्या

डाळ, तांदुळ धुवुन त्यात ६ वाट्या उकळ्ते पाणी घालावे, त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या (मला २ च आवडतात, तुमच्या आवडी प्रमाणे कमी अधिक घालु शकता), मीठ, १/२ चमचा हळद, डाळ घालुन मिश्रण उकडुन घ्यावे.
तेल, मोहरी, हिंग फोडणी घालुन त्यात १-२ लसुण पाकळ्या तळुन घेणे
तळणीच्या मिर्च्या तळुन घेणे

खिचडी वाढतांना डावभर खिचडी त्यावर तळणीची मिर्ची व १/२ डाव तयार केलेली फोडणी घालावी

पालक सुप


२ गड्ड्या पालक
२ दालचिनीचे तुकडॆ
मीठ मिरपुड
४ कप दुध
१०० ग्रॅम किसलेले चीज

पालक धुवुन चिरुन घ्यावा. किंचीत मीठ, दालचिनी घालुन उकडून घ्यावा
गार झाला कि मिक्सरमधुन काढुन गॅसवर उकळी द्यावी, मीठ, मिरपुड, दुध घालुन, सर्व्ह करतांना किसलेले चिज घालुन सर्व्ह करावे.

व्हेजिटेबल सूप


१०० ग्रॅम गाजर
१ वाटी चिरलेली पानकोबी
१ वाटी चिरलेली कांदापात
१/२ वाटी मटारचे दाणे
१/२ वाटी वारीक चिरलेला श्रावण घेवडा
१ चमचा लोणी
१ टे.स्पुन मैदा (किंवा कणीक)
१ मोठा दालचीनीच तुकडा, २ लवंगा, ५ काळे मिरे बारिक पुड करुन.
मीठ चवीनुसार
१ कांदा बारिक चिरुन

कृती
एका पातेल्यात लोणी गरम करुन त्यावर गुलाबी रंगावर परतावा, त्यात मैदा घालुन परतावे व त्यात सर्व बारिक चिरलेल्या भाज्या शिजवाव्यात (३ कप पाण्यात), त्या अर्धवट शिजल्या की दालचिनी, लवंग, मिरपुड, मीठ घालुन पुर्णे शिजु द्याव्यात, नंतर मिक्सरमधुन काढुन सुप सर्व्ह करतांना त्यात १ कप दुध घालुन सर्व्ह करावे.

थालीपीठ (माझी पध्दत)


१. भाजणी २ वाट्या
२. चिमुटभर ओवा
३. मीठ
४. तिखट
५. कांदा
६. कोथिंबिर
७. ४-५ वाट्या पाणी

कृती:

वरिल सर्व जिन्नस पाण्यात भिजवून घेणे, मी जास्त पाणी ऍड करते आणि थालीपीठ धिरड्यांसारखी तव्यावर घालते.
अश्याने ती सॉफ्ट राहतात आणि डब्ब्यातुन पण कॅरी करता येतात. कंव्हेनशनल पध्द्तीने थापुन केलेली थालिपीठ जाड व कोरडी लागतात.

साबुदाणा वडा


१ वाटीभर साबुदाणा
१ वाटी दाण्याचे कुट
५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे वाटुन
२ मध्यव बटाटे उकडलेले
कोथिंबीर, मीठ, साखर
तळण्याकरता तुप

1. साबुदाणा भिजवून ठेवावा. भिजवताना पाव वाटी पाणी ठेवावे व झाकून ठेवावा.
२. बटाटे सोलून कुस्करुन घ्यावे किंवा किसणीवर किसून घ्यावे.
३. भिजलेला साबुदाणा, बटाटा, दाण्याचे कूट, वाटलेले जिरे, मिरची, मीठ, साखर, थोडी कोथिंबीर चिरून घालून सर्व जिन्नस एकत्र करुन चांगले एकजीव मळून घ्यावेत. मळताना खुप कोरडे वाटल्यास थोडा पाण्याचा हात लावावा.
४. कढईत तुप तापत ठेवावे. तापल्यावर गॅस मंद ठेवावा.
५. प्लॅस्टिकच्या कागदाला पाण्याचा हात लावून पिठाचा लिंबाएवढा गोळा त्यावर गोल थापावा व अलगद कढईत सोडावा.
६. मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.
७. वरील पध्दतीने सर्व वडे तळावेत.

फ्लॉवर पराठा


२ वाट्या कणिक
अर्धा किलो फ्लॉवर
२ टे.स्पुन कडकडीत तेलाचे मोहन, मीठ साखर, लाल तिखट
१ चमचा अनारदाणा पावडर
२ चमचे जिरे
पराठे तळायला तेल

१. दोन वाट्या कणीक, तेल, मीठ, साखर घालून घट्ट भिजवावी
२. जाड किसणीवर फ्लॉवर किसून घ्यावा. १ चमचा तेलाची फोड्णी करुन किसलेला फ्लॉवर घालून दोन वाफा येउ द्याव्यात. फ्लॉवर खाली उतरवून मीठ, साखर, तिखट व अनारदाणा पावडर घालावी व अर्धा चमचा कच्चे कुटलेले जिरे घालावे, असे सारण तयार करावे.
३. कणकेच्या १६ लहान लहान लाट्या कराव्यात. २ लाट्या घेऊन पातळ पोळ्या लाटाव्यात. लाटीला कडेने पाण्याचा हात लावून मधे सर्वत्र फ्लॉवरचे सारण सारखे पसरावे. वर दुसरी पोळी घालून कडा दाबून घ्याव्यात. हलक्या हाताने पराठा तव्यावर टाकुन दोन्ही बाजुंनी तेल सोडून खमंग भाजावा.

आलु पराठे



२ वाट्या कणिक
अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पुन कडकडीत तेलाचे मोहन
३ मोठे उकडलेले बटाटे
७-८ लसूण पाकळ्या व ५-६ हिरव्या मिरच्या वाटून
१ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर
मीठ, साखर चवीनुसार, पराठे तळण्याकरता तेल अथवा तुप

१. कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालुन घट्ट भिजवून झाकुन ठेवावी.
२. बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढुन घ्यावेत.
३. किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालुन गोळा तयार करावा.
४. भिजवलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ सारखे भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.
५. कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरुन लाटीचे तोंड सर्व बाजुंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाटावर पिठी लावून लाटावा.
६. जाड अथवा निर्लेपच्या तव्यावर तुप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजुंनी खमंग परतावा.

बदामाचा शिरा

बदामाचा शिरा

१. २०-३० बदाम
२. ३ चमचे तुप
३. साखर
४. ३ कप दुध

कॄती:
१) बदाम १०-१२ तास भिजवुन घ्यावे.
२) भिजल्यावर त्यांची साल काढुन मिक्सरमधुन त्याची जरा जाडसर पुड करुन घेणे.
३) ही पुड तुपावर परतुन त्यात हळुहळु दुध ऍड करणे.
४) जरा घट्ट झाल्यावर त्यात साखर ऍड करुन थोडे शिजवावे

पुलाव

पुलाव

१. दोन भांडी तांदुळ (शक्यतो बासमती)
२. पाव किलो फ्लॉवर
३. एक वाटीभर मटार, गाजर, दोन टोमॅटो, चार कांदे, आवडत असल्यास कॉर्न
४. एक इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या वाटुन
५. तीन चार लवंगा, दालचिनीचे दोन तुकडे
६. ४ हिरवे वेलदोडे, ८-१० काळे मिरे
७. १/२ चमचा जिरे
८. २-३ तमालपत्र पाने
९. मुठभर काजु
१०. २ टे.स्पुन साजुक तुप

कृती:
१) पुलाव करावयाच्या आधी तांदुळ निवडुन धुवुन निथळत ठेवावेत.
२) फ्लॉवरचे तुरे काढुन सोलावे, गाजर सोलुन मधला दांडा काढुन एक इंचाचे उभे तुकडे करावेत. मटार सोलुन घ्यावेत.
३) सर्व भाज्या एकत्र करुन धुवुन घ्याव्यात.
४) कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा.
५) २ टे.स्पुन तुप जाड बुडाच्या पातेल्यात तापायला ठेवावे. त्यात जिरे, लवंग, दालचिनीचे तुकडे, वेलची, तमालपत्राची पाने, काळे मिरे घालुन फोडणी करावी. त्यात कांदा घालावा. कांदा पारदर्शक झाला की, धुतलेल्या भाज्या घालाव्यात. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
६) मी वरील मिश्रणात तयार भात ऍड करते. पण ऑथेंटीक पुलावात वरील भाज्यांमधे तांदुळ परतावे. तांदुळ परतले गेले की तांदुळाच्या दुप्पट पाणी घालुन शिजवावे.
७) चवील मीठ, काजु ऍड करावे.

गाजराची भाजी

गाजराची भाजी

१. अर्धा किलो लाल गाजरे
२. १ डाव तेल, फोड्णीचे साहित्य
३. १ चमचा लाल तिखट
४. १/२ चमचा काळा मसाला
५. १ टे.स्पुन तिळकुट किंवा सोललेला मटार वाटीभर
६. मीठ, साखर, कोथिंबीर, खवलेला नारळ १ वाटी

कॄती:
१) गाजरे सोलाण्याने सोलुन बारीक चिरावीत
२) तेलाची मोहरी टाकुन त्यात हळद व चिरलेली गाजरे घालुन परतावे व झाकण ठेवुन शिजवावे. (मी कुकरमधे १ शिट्टी मारुन घेते.)
३) त्यात मीठ, साखर, तिखट, मसाला, मटार, खोबरे, कोथिंबीर घालावे.

टोमॅटो सुप

टोमॅटो सुप:
१. अर्धा किलो टोमॅटो
२. २ मोठे कांदे
३. १ इंच आल
४. दोन लवंगा, १ छोटा दालचीनीचा तुकडा, ४-५ काळे मिरे
५. २ टेबलस्पुन कॉर्नफ्लॉवर
६. १ मोठा कप दुध
७. १ टेबलस्पुन लोणी
८. १०० ग्रॅम फ्रेश क्रिम
९. चार ब्रेड्चे स्लाइस तळण्याकरता तुप
१०. मीठ साखर चवीनुसार, थोडी चिरलेली कोथिंबीर

कॄती:
१) टोमॅटोचे मोठे तुकडे करावेत. कांदे, आल बारिक चिरुन घ्यावे. कुकरमध्ये टोमॅटो, कांदा व आल दोन भांडी पाणी घालुन उकडुन घ्यावेत.

२) एका जाड बुडाच्या पॅनमध्ये एक चमचा लोणी घालुन गॅसवर ठेवावे व त्यात कॉर्नफ्लॉवर गुलाबी रंगावर परतुन घ्यावे. त्यात हळुहळु दुध घालत सतत हलवत गुठ्ळी होउ न देता व्हाइटसॉस तयार करुन घ्यावे.

३) लवंग, दालचीनी व काळे मिरे यांची बारिक पुड करुन घ्यावी. ब्रेडचे स्लाइस एकसारखे चौकोनी तुकडे करुन तळुन बाजुला ठेवावेत.

४) उकडलेले टोमॅटो गार झाल्यावर मिक्सरमधुन काढुन गाळुन अथवा श्रीखंडाच्या यंत्रातुन गाळुन घ्यावे (मी हे करायचा कंटाळा केला होता पण त्याने काही फारसा फरक जाणवला नाही)

५) गाळलेल्या टोमॅटोचा रस गॅसवर ठेवुन चवीनुसार मीठ, साखर घालुन उकळु द्यावा. उकळी आल्यावर त्यात लवंग, दालचिनी व मिरयाची पुड घालावी

६) सर्व्ह करण्यापुर्वी व्हाईटसॉस व ब्रेडचे तुकडे, कोथिंबीर ऍड करावेत.