Wednesday, March 31, 2010

शाही कोफ्ता पुलाव


१. दोन वाट्या बासमती तांदुळ
२. २ वाट्या मटार सोललेले
३. १ वाटी श्रावणघेवडा (मी होल ग्रीन बीन्स वापरलेले)
४. १ वाटी गाजराचे तुकडे

कोफ्त्याकरता साहित्य:
१. पाव किलो खवा
२. १ उकडलेला बटाटा
३. १ टे. स्पुन कॉर्नफ्लॉवर
४. २ हिरव्या मिर्च्या
५. १/२ इंच आल
६. २-३ लसुण पाकळ्या वाटुन
७. मीठ, मिरपुड चवीनुसार
८. तुप
९. पाव चमचा शहाजिरे, ३-४ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, ४-५ काळेमिरे
१०. २ मोठे कांदे उभे चिरुन
११. मुठभर काजु
१२. २५ ग्रॅम बेदाणे

क्रूती:

१. पाव किलो खवा, १ उकडलेला बटाटा श्रीखंडाच्या यंत्रातुन गाळुन त्यात १ चमचा कॉर्नफ्लॉवर, आल, मिरची, मीठ, मिरपुड लसुण घालावे. हलक्या हाताने ४०-४२ गोळे करुन तुपात तळावेत.

२. निम्मा चिरलेला कांदा व काजु तळुन बाजुला ठेवावे.

३. जाड बुडाच्या पातेल्ल्यात तुप गरम करुन जिरे, वेलदोडे, लवंगा, दालचिनी घालुन फोडणी करावी, त्यात चिरलेला निम्मा कांदा घालुन परतावे. त्यावर भाज्या घालून परतावे. धुवुन निथळुन ठेवलेले तांदुळ घालुन परतावे, त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी घालुन उकळते पाणी घालुन चवीनुसार मीठ घालावे. मंद आचेवर पुलाव शिजु द्यावा.

४. वाढताना वरुन तळ्लेले कोफ्ते, काजू व कांदा घालून सजवून वाढावे.

Monday, March 29, 2010

पालक पनीर

१. २ गड्ड्या पालक
२. २-३ हिरव्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल
३. १ मोठा कांदा बारीक चिरुन
४. १ डाव रिफाईंड तेल, जिरे फोडणीकरता
५. १ मोठा टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून साल काढून बारीक चिरावा
६. पाव किलो पनीर, पनीर तळण्याकरता तेल
७. मीठ
८. १ चमचाभर गरम मसाला पावडर

क़ृती:

१. पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरावा. १ चिमुटभर सोडा घालून उकडून घ्यावा व चाळणीत निथळत ठेवावा. पाणी बाजुला ठेवावे.

२. पनीरचे अर्धा इंच लांबी रुंदीचे चौकोनी तुकडे करुन गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.

३. उकळून निथळलेला पालक पाट्यावर अथवा मिक्सरवर बारीक वाटावा.

४. कढईत तूप किंवा रिफाईंड तेलाची जिरे घालून फोडणी करावी व फोडणीत बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.

५. कांद्यात मिरची आल लसूण बारीक वाटून घालावे. उकडून चिरलेला टोमॅटो व गरम मसाला घालून परतावे. तूप बाजूला सुटले की वाटलेला पालक व तळलेले पनीर घालावे. पळीवाढ करण्याकरता उकडलेल्या पालकातल्या पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करावा. चवीनुसार मीठ घालावे.

६. पालक व पनीर शिजेपर्यंत शिजवावे व उतरवावे.

Wednesday, March 24, 2010

भेंडीची चिंच गुळाची भाजी

१. पाव किलो भेंडी
२. थोडी चिंच भिजवून कोळ काढून (मी रेडिमेड चिंचेचा पल्प वापरते)
३. मीठ व गूळ चवीनुसार
४. १ डाव तेल व फोडणीचे साहित्य

क़ूती:

१. भेंडी धुवून कोरडी मोठी चिरावी.
२. पातेल्यात तेल, हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करुन त्यात चिरलेली भेंडी घालून परतावे.
३. परतलेल्या भेंडीवर चिंचेचा कोळ घालावा. १ वाटी पाणी घालून झाकण ठेवून शिजवावे.
४. भेंडी शिजल्यावर चवीनुसार मीठ व गूळ घालावा. भाजीला दाटसर रस ठेवून चिरलेली कोथिंबीर घालून भाजी उतरवावी.

व्हेरीयेशन:

चिंचे ऐवजी अर्धी वाटी आंबट ताक व हिरवी मिरची व १ टे. स्पुन दाण्याचे कुट घालून भाजी उतरवावी.

Saturday, March 13, 2010

व्हेजिटेबल बिर्याणी


४ भांडी बासमती राइस
६ टे. स्पुन तुप
१ चमचा जिरे
५ तमालपत्र पान
३ हिरवे वेलदोडे
५ लवंगा
५ दालचिनीचे तुकडे

१/२ किलो फ्लॉवर
१/२ किलो बटाटे उकडुन
१/२ किलो लाल गाजर - पातळ उभे तुकडे
१ भोपळी मिर्ची
१ बीट
१ इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या वाटुन
१/२ किलो कांदे उभे पातळ चिरुन
पाव किलो टोमॅटो पातळ चिरुन
५० ग्रॅम काजु,२५ ग्रॅम बेदाणे

बिर्याणी मसाला - २ टे. धने, १ टे. सुके खोबरे, १ टे. खसखस, १ टे. बडीशेप, १ टे. स्पुन काजु तुकडा, ५ लवंगा, ३ दालचिनीचे तुकडे, ५ काळे मिरे, ५ सुक्या मिर्च्या, १ चमचा जिरे, मिठ - हे जिन्नस १ चमचा तेलावर भाजुन कुटुन घ्यावे. हा मसाला रेडिमेड पण मिळतो.
३० मिनिट तांदुळ कोमट पाण्यात घालुन ठेवावे
पातळ चिरलेला कांदा परतुन, काजु व बेदाणा परतुन बाजुला ठेवावे.

उकडलेल्या बटाट्याच्या गोल चकत्या कराव्यात

परतलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा बारीक वाटुन घ्यावा.
सर्वे भाज्या उकळत्या पाण्यात वाफवुन घ्याव्या
तांदुळ एका भांड्यात शिजवुन घ्यावा. (मी कुकरमधे शिजवुन घेते)

एका मोठ्या कढईमधे २ टे. तुपाची फोडणी करुन त्यात जिरे, तमालपत्र, वेलदोडे, लवंगा, दालचिनी घालुन त्यात कांदा, आल, लसुण घालुन सर्व भाज्या परतुन घ्यावा. त्यात भात व बिर्याणी मसाला घालुन नीट मिक्स करुन घ्यावे, सर्व्ह करतांना थोडा तळलेला कांदा व काजु, बेदाणे घालावे.

(सर्वे मिक्स करायच्या ऐवजी लेयर्स मधे सुध्दा बिर्याणी करता येते, लेयरस मधे - उकडलेले बटाटे- परतलेल्या भाज्या - भात - भाज्या)

खिचडी


२ वाट्या तांदुळ
१ वाटी तुरीची डाळ
३-४ लसुण पाकळ्या
१ वाटी तेल
मीठ
५ तळणीच्या मिर्च्या

डाळ, तांदुळ धुवुन त्यात ६ वाट्या उकळ्ते पाणी घालावे, त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या (मला २ च आवडतात, तुमच्या आवडी प्रमाणे कमी अधिक घालु शकता), मीठ, १/२ चमचा हळद, डाळ घालुन मिश्रण उकडुन घ्यावे.
तेल, मोहरी, हिंग फोडणी घालुन त्यात १-२ लसुण पाकळ्या तळुन घेणे
तळणीच्या मिर्च्या तळुन घेणे

खिचडी वाढतांना डावभर खिचडी त्यावर तळणीची मिर्ची व १/२ डाव तयार केलेली फोडणी घालावी

पालक सुप


२ गड्ड्या पालक
२ दालचिनीचे तुकडॆ
मीठ मिरपुड
४ कप दुध
१०० ग्रॅम किसलेले चीज

पालक धुवुन चिरुन घ्यावा. किंचीत मीठ, दालचिनी घालुन उकडून घ्यावा
गार झाला कि मिक्सरमधुन काढुन गॅसवर उकळी द्यावी, मीठ, मिरपुड, दुध घालुन, सर्व्ह करतांना किसलेले चिज घालुन सर्व्ह करावे.

व्हेजिटेबल सूप


१०० ग्रॅम गाजर
१ वाटी चिरलेली पानकोबी
१ वाटी चिरलेली कांदापात
१/२ वाटी मटारचे दाणे
१/२ वाटी वारीक चिरलेला श्रावण घेवडा
१ चमचा लोणी
१ टे.स्पुन मैदा (किंवा कणीक)
१ मोठा दालचीनीच तुकडा, २ लवंगा, ५ काळे मिरे बारिक पुड करुन.
मीठ चवीनुसार
१ कांदा बारिक चिरुन

कृती
एका पातेल्यात लोणी गरम करुन त्यावर गुलाबी रंगावर परतावा, त्यात मैदा घालुन परतावे व त्यात सर्व बारिक चिरलेल्या भाज्या शिजवाव्यात (३ कप पाण्यात), त्या अर्धवट शिजल्या की दालचिनी, लवंग, मिरपुड, मीठ घालुन पुर्णे शिजु द्याव्यात, नंतर मिक्सरमधुन काढुन सुप सर्व्ह करतांना त्यात १ कप दुध घालुन सर्व्ह करावे.